ग्रामगीतेतील स्वच्छता विचार

मी समजतो गावहि शरिर । त्यास राखावे नेहमी पवित्र ।

त्यानेच नांदेल सर्वत्र । आनंद गावी ॥

जैसे आपण स्नान करावे । तैसेे गावहि स्वच्छ ठेवित जावे ।

सर्वचि लोकांनी झिजुनि घ्यावे । श्रेय गावाच्या उन्नतीचे ॥

आपण तेवढे स्वच्छ राहावे । भोवती गलिच्छ वातावरणचि पाहावे ।

याने सुमंगलता कधी न पावे । तन,मन होई दुषित ॥

मिळोनि करावी ग्रामसफाई । नाली, मोरी ठायी ठायी ।

हस्ते परहस्ते साफ सर्वहि । चहुकडे मार्ग ॥

त्यात जी जी निघेल घाण । ती दुर न्याची गावापासुन ।

अस्ताव्यस्त न देता फेकुन । नीट व्यवस्था लावावी ॥

त्यासाठी करावे खतखड्डे । गावाबाहेर जागी उघडे ।

जनावरांचे मलमुत्र सापडे । तेहि त्यातचि भरावे ॥

अहो! हि निसर्गाचि रचना । समाजलीच पाहिजे सर्व जना।

खाद्यचि होते कत जाणा । खतापासोनी खाद्योत्पत्ति ॥

गोव-या करोनी जाळिती । ते माहालाभास आंचवती ।

शेणात आहे लक्ष्मीची वसती । धर्मग्रंथीहि वचन ऐसे ॥

म्हणोनी सर्व गावाचे मलमुत्र । जमवोनी झाकावे जाणोनी तंत्र ।

त्याने गावाची जमिन सर्वत्र । खतवोनी द्यावी ॥

सर्वांनी गाव स्वच्छ करावे । तेणे आरोग्य नांदेल बरवे ।

घाण-खतातुनी नवनवे । वैभव येईल उदयासि ॥

- रा.तुकडिजी महाराज

▲ Top
Hotel - This is a contributing Drupal Theme
Design by WeebPal.