परुळे येथील ऐतिहासिक देवस्थान म्हणजे श्री. देव आदिनारायण. हे मंदिर सुमारे साडेसातशे वर्षांपुर्वीचे आहे. जगातील केवळ दोन प्राचीन सुर्यमंदिरांपैकी एक म्हणजे श्री. देव आदिनारायण मंदिर होय. मुर्ती व देवालय पश्चिमाभिमुख आहे. ही मुर्ती काळ्या पाषाणातील आहे. देवांचे वाहन रथ आहे. त्यामुळे रथसप्तमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. प्रशस्त सभामंडप, सुसज्ज भक्तनिवास अशी व्यवस्था देवस्थानने केली आहे. इथे नेहमी भाविकांची वर्दळ असते.
गावातील मंदिरे
वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गावचे ग्रामदैवत असलेले श्री.देव वेतोबा चे मंदिर कुशेवाडा येथे आहे. मंदीर जुन्या पद्धतीचे कौलारु आहे. श्री.देव वेतोबाची मुर्ती काळ्या पाषाणातील आहे. दगडी विटेवर उभी,डोक्यावर शेषस्वरुप जाळ, कानात रुद्राक्ष मुद्रिका, दोन्ही हातांचे दंडांस सर्पाकृती, उजव्या हाती उभी तलवार, उजव्या हाती कंकण व अंगठी,डाव्या हातात तिर्थकुंड, गळ्यात यज्ञोपवित, वारुड माळा व दगडी पद्महार, कमरेभोवती दगडी विणलेला गोफ, दोन्ही मांड्यांवर सर्पाचे वेस्टन, डोळे व कल्ले चांदीचे, पायात पादुका पितळी व चांदीच्या. श्री. देव वेतोबा भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री.देवी भावई, श्री.देव रवळनाथ ही मंदिरे या परिसरात आहेत. तसेच श्री. मुंडयेवस, प्रभुवस,मडवळवस आदि मंदीरे आहेत. श्री. देव वेतोबा देवस्थानचा दसरोत्सव व त्यानंतर श्री.कुलस्वामिनी मंदीर कोंडसवाडी येथे बाक लावणे हे मोठे उत्सव येथे संपन्न होतात. तसेच आषाढ शुद्ध एकादशी जागर,श्रावण सोमवार, श्रावण शु.पौर्णिमा,गालड्या टोपणे जागर, गोकुळाष्टमी, अश्विन शु, प्रतिपदा(घटस्थापना), अश्विन शु, अष्टमी ,नवमी,द्वादशी,(तुळशी विवाह) दादरे,गुढीपाडवा,रामनवमी,तसेच १ मे रोजी वर्धापनदिन साजरा कारण्यात येतो.
श्री. देव पुरुषोत्तम मंदिर गवाणवाडी येथे आहे. हे भारद्वाज गोत्रियांचे कुलदैवत आहे. मंदिर प्रशस्त आहे. बाजुला ओढा आहे. येथील वातावरण रमणीय व थंडगार आहे. परुळे बाजारपेठेपासुन साधारण २ कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे.
श्री. देवी वराठी ही परुळे गावची ग्रामदेवता आहे. माहेरवासिनींच्या नवसाला पावणारी म्हणुन या देवीची ख्याती आहे. श्री. देवी वराठीचे मंदीर कौलारु आहे व समोर प्रशस्त सभामंडप आहे. काळ्या पाषाणातील महिषासुरमर्दिनी च्या रुपातील मुर्ती आहे. ही मुर्ती अष्टभुजा आहे. मंदिरातील जत्रोत्सवाचा दिवस सर्वांच्या विचारानुसार ठरविला जातो. येथे होळीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी ५ मे रोजी देवीचा वर्धापनदिन सोहळा संपन्न होतो. दसरोत्सव हा देखील येथील मुख्य उत्सव आहे.